फुलपाखरांच आयुष्य?

फुलपाखरं नैसर्गिक रित्या किती काळ जगू शकतं हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे ,जसे कि - फुलपाखराचा आकार, प्रजाती, ठिकाण, वर्षातील कोणत्या महिन्यात ते प्रौढावस्थेत येतंय वगैरे वगैरे. फुलपाखरांचं सरासरी आयुष्य हे १ महिन्याचे असते. लहान फुलपाखरांच आयुष्य हे एका आठवड्यापुरतेच असते.  त्यातल्या त्यात मोनार्च जातीची फुलपाखरं ९ महिन्यांपर्यंत जगू शकतात. त्यामुळे, फुलपाखरू जितकं लहान तितकंच त्याचं आयुष्य पण लहान असा एक साधा निष्कर्ष आपण लावू शकतो.

फुलपाखरांच्या वाढीच्या किनवस रूपांतरच्या अंडी, अळी, कोषफुलपाखरू अशा चार अवस्था आहेत.

अंडी - विशिष्ट प्रजातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवरच अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट हे ठरलेले असते. फुलपाखराची मादी मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती शिकाऱ्यांची  भक्ष्य होऊ नयेत. अंड्याचा आकार, रंग आणि घडण प्रत्येक प्रजाती मध्ये वेगवेगळी असते.

अळी/सुरवंट - एका आठवड्याच्या कालावधीनंतर अंड्यांमधून अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. हा सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा तो अक्षरशः फडशा पाडायला सुरुवात करतो. ह्या सुरवंटांचे सुद्धा त्या त्या प्रजाती प्रमाणे वेगवेगळे आकार आणि रंग असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात. केसाळ असलेली सुरवंट हि शक्यतो फुलपाखराची नसून पतंगाची असतात.
आणखीन एक म्हणजे, सगळेच सुरवंट शाकाहारी नसतात!! काही प्रजातींमधली सुरवंट हि मावा किडीवर किंवा मुंग्यांचे लार्व्हा सुद्धा खातात.
ही अवस्था साधारण २-३ आठवडे असते. ह्या दरम्यान सुरवंटाचा आकार मोठा होत असतो तसा ते कात टाकल्याप्रमाणे ३ ते ४ वेळा स्वतःवरचे आवरण काढून टाकतो.

कोष - सुरवंटाची वाढ पूर्ण झाली की तो झाडावर एखादी सुरक्षित जागा शोधतो आणि त्या जागी स्थिर होते. सुरवंट स्वतःभोवती कोष करत असताना त्याचे त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा १ आठवड्यापासून ते काही महिन्यांपर्यंत असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून आहे.

फुलपाखरू - कोषात असतानाच सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. बाहेर आल्यानंतर फुलपाखरू काही काळ स्थिरावते. त्यादरम्यान, त्याच्या पोटात असलेले पाणी ते पंखांमध्ये ढकलत असते. हे होत असताना, फुलपाखराचे पंख हळूहळू मोठं होत असलेले दिसतात. पंख पूर्णपणे मोठे झाल्यावर पंखांची हालचाल सुरू होते. ज्यामुळे पंख कोरडे आणि सरळ होण्यास मदत मिळते आणि आपली पुढची पिढी तयार करण्यासाठी ते हवेत झेप घेते.

Comments