फुलपाखरांचे चिखलपान

Written By Parag Kokane on Wednesday, November 20, 2019 | 4:19 PM

अनेक फुलांना भेटी देऊन फुलपाखरे मधुरस किंवा मध प्राशन करताना आपण बघितलेच असेल. पण मधुरसातून फुलपाखरांना त्यांच्या शरीराला आवश्यक असलेली इतर खनिजे, क्षार, आम्ले मिळत नाहीत आणि नेमकी ह्याचसाठी फुलाफरांना चिखलपान (mud puddling) करण्याची गरज भासते.

रानांमधील झऱ्याजवळ, प्रवाहांजवळ, ओढ्यांजवळ असलेल्या ओल्या जमिनीवर किंवा चिखलावर तुम्हाला अशीच फुलपाखरांची शाळा भरलेली दिसू शकते. एकाच वेळी वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे एकत्र बसलेली फुलपाखरे अतिशय सुंदर दिसतात. हि सर्व त्या चिखलामधून जीवनावश्यक असलेली पोषक द्रव्ये शोषून घेत असतात. ह्यालाच आपण चिखलपान किंवा Mud Puddling म्हणतो. चिखलपान हा अनेक इतर उपायांमधला एक उपाय आहे. काही जातीची फुलपाखरे प्राण्यांच्या विष्टेतून, सडणाऱ्या फळांच्या सालींमधून किंवा मेलेल्या प्राण्यांमधूनसुद्धा त्यांना आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मिळवितात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधे विविध प्रकारची फुलपाखरे आढळतात. स्वोर्डटेल, कॉमन जे, ब्लू बॉट्ल, इमीग्रंट, लेपर्ड अशी अनेक सुंदर फुलपाखरे असे चिखलपान करताना तुम्हाला हमखास दिसतील. सतत उडत असलेल्या फुलपाखरांचे फोटो काढणे एरवी सोप्पे काम नाही, अशावेळी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या अनेक फुलपाखरांचे चिखलपान करताना होतो काढणे हि एक प्रकराची पर्वणीच म्हणायची. फुलपाखरांप्रमाणे काही इतर कीटक सुद्धा अशाचप्रकारचे चिखलपान करताना आढळतात.

सह्याद्री मध्ये पावसाळ्या नंतर अनेक रानफुलं फुलल्यामुळे आणि ठिकठिकाणी पाण्याचे साठे असल्यामुळे फुलपाखरांचे अनेक थवे दिसू लागतात. पण चिखलपान बघण्याची अगदी हमखास संधी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उपलब्ध असते. तापमान वाढलेले असताना रानांत थोडे पाणी शिल्लक असलेल्या ओढ्यातील चिखलात चिखलपान करताना फुलपाखरे आढळू शकतात.

सह्याद्रीतच काढलेला, ब्लू बॉटल जातीच्या फुलपाखरांचा चिखलपान करतानाचा हा खालील व्हिडीओ:

SHARE

About Parag Kokane

0 comments :

Post a Comment