सध्या जगभरात कोरोनाचं थैमान पाहायला मिळतंय. शंभरहून अधिक देशांना कोरोनाचा फटका बसलेला आहे. आज ना उद्या कोरोनाच्या विळख्यातून जग बाहेर पडेलच, ह्यात शंका नाही!! पण अशावेळी, जेव्हा चारही बाजूंनी फक्त नकारात्मक बातम्या ऐकायला मिळतात, तेव्हा गेल्या काही दिवसात पर्यावरणासाठी घडत असलेल्या काही सकारात्मक गोष्टींकडे सुद्धा बघणे इष्ट ठरेल.
कोरोना विषाणूचे केंद्रबिंदू असलेला चीन हे जगातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र आहे. गेली अनेक दशके, दिवसरात्र चालू असलेल्या कारखान्यांमधून अतोनात प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड (CO2) चे उत्सर्जन इथून होत आहे. मागील काही महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे चीनमध्ये तेल आणि स्टील सारख्या उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट करण्यात आली आणि ह्या कारखान्यांना कुठेतरी ब्रेक लागले. कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाच्या बाबतीत चीन हा जगातील सर्वात मोठा भागीदार आहे. त्यामुळे, हा बदल पृथ्वीच्या पर्यावरणासाठी निश्चितच खूप फायदेशीर असेल.
त्याचबरोबर, अनेक देशांनी देशांतर्गत/देशाबाहेरील विमान उड्डाणे कमी केल्याने हवेतल्या प्रदूषणावर आणि जलवाहतूकीवर लावलेल्या निर्बंधामुळे जलप्रदूषणावर सुद्धा काही प्रमाणात नक्कीच परिणाम झालेला आढळून येईल.
आजचा २२ मार्च हा दिवस, भारतामध्ये कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी "जनता कर्फ्यू" म्हणून अतिशय उत्कृष्ठ रित्या पाळला जातोय, लोकांचा १००% प्रतिसादही मिळालेला दिसतोय. इतर दिवशी रहदारीने तुडुंब भरलेले रस्ते, बागा, पर्यटन स्थळे, आज सर्वच निर्जन आहे. सकाळपासूनच कोणत्याही वाहनांचा आवाज नाही, आजूबाजूला कुठूनही बांधकामाचे आवाज नाहीत, मुलांचे खेळण्याचे आवाज नाहीत. सर्वच अगदी स्तब्ध आहे. ह्या ब्रेकची, पृथ्वीला नितांत गरज होती. Earth is breathing again!! :)
0 comments :
Post a Comment