डिसेंबर आलाय, वर्ष संपायला फार दिवस नाही उरलेत, त्यामुळे उरलेल्या दिवसांत निसर्गात फिरायला जाण्याचा बेत नाही. तसं बघितलं तर या वर्षात निसर्गात फिरण्याच्या बऱ्याच ट्रिप्स केल्या.
मग ते, बायको आणि मुलाबरोबर ३ दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ फुलं बघण्यासाठी दसऱ्याला सीमोल्लंघन करून गाठलेलं कास पठार असो किंवा २ ऑर्किड्स बघण्यासाठी भल्या पहाटे महाबळेश्वरला जाऊन साजरी केलेली दिवाळी पहाट असो किंवा मित्राबरोबर भिगवण परिसरात घुबड आणि काळवीट बघण्यासाठी भल्या पहाटे केलेली पळापळ असो. काही ट्रिप्स पाहिजे ते न दिसल्यामुळे असफलही झाल्या. पण सगळ्या गोष्टींचा अनुभव खूपच खास होता.
अरे हो, आणखीन एक विसरलोच. माझा मुलगा आणि आमच्या "ऑर्किड मॅन" मित्राबरोबर ३ दिवसांत ३ राज्यांत फिरून काही प्रादेशिक फुलं, ऑर्किड, साप, बुरशी इत्यादीचा गोळा केलेला खजिना..
या सगळ्यांत काल आणखीन एक भन्नाट अनुभव घेतला. समुद्रीजीव बघायचं बऱ्याच दिवसांपासून डोक्यात होतंच. या विषयांत माहितगार असलेल्या मुंबईच्या मित्रामुळे काल तो योग आला. ठिकाण होतं, मुंबईच्या मलबार हिल जवळचा समुद्र किनारा.
काल पाहिलेल्या समुद्रीजीवांत, ठराविक वेळाने पाण्याची पिचकारी उडवणारे शिंपले, शंखात राहणारा खेकडा (Hermit Crabs), प्रवाळ (corals), समुद्रपुष्प (Sea Anemone), Sea Slugs (याला मराठीत शब्द नाही), इत्यादीचा समावेश होता.
यातला मला स्वतःला आवडलेला समुद्रीजीव म्हणजे Sea Slugs. आता Sea Slug म्हणजे काय सांगायचं झालं तर, पाठीवर शंख नसलेली गोगलगाय. वेगवेगळे रंग आणि अंगावरच्या designs मुळे, कमालीचे सुंदर दिसतात हे जीव. एक महत्त्वाची सूचना - कितीही सुंदर दिसले तरी त्यांना हात लावण्याचा मोह आवरलेला बरा. यातले बरचसे जीव विषारी असतात. त्यांच्या आकारमानाकडे बघता माणसाच्या जीवाला धोका नसला तरी विषाची परिक्षा न केलेलीच बरी.
काही slugs त्यांच्या छोट्या आकारामुळे (तांदुळाच्या दाण्याएवढी) आणि काही आजूबाजूच्या वातावरणात मिसळून जाणाऱ्या रंगसंगतीमुळे, यांना शोधणं म्हणजे महाकठीण काम. हिवाळा ऋतु यांना पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. कारण यावेळीच अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारी ते येतात. अर्थात दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे "ओहोटी". ओहोटीच्या वेळी जेव्हा पाणी समुद्रात ओढले जाते तेव्हा काही समुद्रीजीव खडकांमधल्या खाचखळग्यात अडकून पडतात.
खडकांमधले हे जीव बघण्यासाठी त्या खडकांवर उड्या मारत केलेला खटाटोप, आज दुसऱ्या दिवशी पाय भरून आल्यामुळे चांगलाच जाणवतोय. पण तक्रार नाही. उलट एक सुंदर अनुभव गाठीशी आला याचं समाधानच आहे.
0 comments :
Post a Comment