पक्षी कसे ओळखावेत?

Written By Parag Kokane on Saturday, January 26, 2019 | 6:16 PM

पक्षी निरीक्षण हा एक अतिशय आकर्षक आणि आनंददायक छंद आहे. पक्षी निरीक्षण चा अर्थ नुसतेच "पक्षी बघणे" असा नसून - पक्ष्यांचे अभ्यासपूर्ण आणि लक्षपूर्वक निरीक्षण करणे असा आहे. बरं, पक्षी बघण्यासाठी दरवेळी जंगलातच जावे लागते असंही काही नाहीये. बघणाऱ्याला पक्षी आजूबाजूला कुठेही दिसू शकतात - शेतात, मैदानात, बागेत, झाडाझुडपात, नदी किनारी, समुद्र किनारी, डोंगर पठारावर किंवा अगदी रहदारीच्या रस्त्यांवर सुद्धा.
कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेर असलेली माळरानं, जंगल, नदी, ओढे, धरण, नाले हा अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींचा प्रमुख अधिवास आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी जर तुम्ही अशी काही ठिकाणे निवडलीत तर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती एकाच ठिकाणी बघण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
एखादा अनुभवी पक्षी निरीक्षक; निरीक्षणा दरम्यान अगदी पटापट पक्ष्यांची ओळख करून नोंदी करून घेताना तुम्ही बघितलं असेल.. "कसं काय बरं ह्याला जमतय ओळखायला ?" असा अनेकदा प्रश्नही पडला असेल! पण पक्षी ओळखणं खरंच वाटत तेवढं कठीण काम आहे का? तर नाही.. फक्त पक्ष्याचे निदान करण्यासाठी तुम्हाला काही बाबींची बारकाईने नोंद घ्यावी लागेल इतकेच. उदाहरणार्थ -
  • पक्ष्याची शरीर रचना, आकार
  • रंग
  • वर्तन
  • आवाज
  • अधिवास
  • चोचीचा आकार इत्यादी
निरीक्षणाची वेळ:
बहुतेक दिनचर पक्षी हे सकाळी उजाडल्यावर लगेच आणि सायंकाळी मावळायच्या थोडं आधी खूप सक्रिय असतात. त्यामुळे साधारणपणे सकाळी ६:३० ते ८:३० आणि सायंकाळी ४:०० ते ६:०० ह्या पक्षी निरीक्षणासाठी योग्य वेळा आहेत. निशाचर पक्षी बघण्यासाठी किंवा त्यांचे आवाज ऐकण्यासाठी मात्र तुम्हाला रात्रीचेच बाहेर पडायला हवे.

स्थलांतर:
वर्षातील ठरलेल्या मौसमात, एका भागातून दुसर्या भागात स्थलांतर करणे हे पक्ष्यांचं खास लक्षण आहे. पक्ष्यांच्या स्थलांतर करण्यामागे - अन्न, हवामान, सवयी, प्रजनन अशी अनेक कारणे असू शकतात. स्थलांतर करत असताना वर्षानुवर्षे ठरलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमण करताना; पक्ष्यांची थांबा घेण्याची ठिकाण सुद्धा तीच ठरलेली असतात. हिवाळ्यात भारतामध्ये अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात तर पावसाळा हा अनेक स्थानिक/स्थलांतरित पक्ष्यांसाठी विणीचा हंगाम असतो.
त्यामुळे पक्षी निरीक्षणास जाताना - कोणते पक्षी वर्षातल्या कोणत्या महिन्यात ठराविक जागेवर दिसू शकतात ह्याचा आधीच अभ्यास करून ठेवला तर त्याचा निरीक्षण क्षेत्रावर तुम्हाला निश्चितच खूप फायदा होईल. त्याशिवाय, प्रत्यक्ष निरीक्षण क्षेत्रावर; पक्षी शोधण्यासाठी एखाद्या मार्गदर्शक पुस्तकाचा किंवा Mobile App चा संदर्भासाठी अवश्य वापर करावा. NATURE WEB तर्फे विकसित केलेले Indian Birds हे Mobile App भारतातील नवशिक्या किंवा अनुभवी निरीक्षकासाठी; अनेक वैशिष्ट्ये असलेले उपयुक्त App आहे.

निरीक्षणाच्या नोंदी:
निरीक्षण क्षेत्रावर सगळ्यात आधी नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पक्ष्यांचा अधिवास. तुम्ही ज्या कोणत्या निरीक्षण क्षेत्रामध्ये गेला आहात त्याप्रमाणे पक्ष्यांचे - माळरानातले, समुद्री, नदीवरचे, डोंगरदऱ्यांमधले, घनदाट जंगलातले असे वर्गीकरण करून घ्या.
त्यानंतर नोंद करा पक्ष्याच्या आकाराची. आकाराची नोंद करताना, तुम्हाला माहित असलेल्या पक्ष्यांना डोळ्यासमोर ठेऊन तुलना करावी. म्हणजे दिसलेला पक्षी हा तुलनेने चिमणी, मैना, कावळा ह्यांच्या पेक्षा लहान आहे, तेवढाच आहे का मोठा आहे हे ह्याची नोंद करावी.

आकार लक्षात घेतल्यानंतर, नोंद घ्या ती पक्ष्याच्या रंगाची. काही पक्षी हे बहुरंगी असू शकतात. अशा वेळी पक्ष्याचा मूळरंगाची नोंद करावी. त्याबरोबरच, पर्यायी पक्ष्याचा आवाज, उडण्याची पद्धत (उदा. पंख न हलवता तरंगणे, जलद झेप, सरळ उड्डाण) अशा काही गोष्टी निरीक्षणाद्वारे नोंदून ठेवा.


चोचीचे आकार बघताना मासे पकडता येण्यासारखी, चिखलातून अन्न शोधण्यासारखी, लाकूड तासण्यासारखी, फुलातील मध शोषण्यासाठी, बिया किंवा कठीण फळे फोडून खाण्यासारखी, मांस फाडून खाण्यासारखी वगैरे असे वर्गीकरण करून ठेवा.



तुमच्या नोंदी जितक्या उत्कृष्ट होतील तितकंच निदान करणे सोपं होऊन जाईल. तुम्ही हळूहळू जसे पारंगत होत जाल तसे मार्गदर्शकामध्ये शोधण्याची तुमची क्रिया जलद होऊ लागेल कारण साधारण आकारा वरून, अधिवासवरून तुम्ही वर्गीकरण पटापट करू शकाल. शिकण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी, मराठी इंग्रजी नाव बघण्यासाठी, शास्त्रीय नाव बघण्यासाठी, नोंदी करण्यासाठी आणि इतरही बऱ्याच गोष्टींसाठी Indian Birds App नक्की वापरून बघा.
SHARE

About Parag Kokane

2 comments :

  1. एखादं पक्षी निरीक्षणा वर पुस्तक सुचवाल का, किंवा महाराष्ट्रात आढळणारे पक्षी ह्यावर एखादं पुस्तक सांगा.

    ReplyDelete
  2. पक्षी निरीक्षणासाठी आणि एकूणच पक्ष्यांच्या इत्यंभूत माहिती साठी Birds of the Indian Subcontinent हे पुस्तक उत्तम आहे. ह्यात फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातल्या सगळ्याच पक्ष्याची माहिती योग्य प्रकारे मंडळी आहे. ऍमेझॉन वरची पुस्तकाची हि लिंक - https://amzn.to/3hr5n9g

    ह्या शिवाय, तुम्ही NATURE WEB चे Indian Birds हे ऍप सुद्धा वापरू शकता -
    https://play.google.com/store/apps/details?id=com.kokanes.birdsinfo

    ReplyDelete