Finding a lifer in beautiful Parule!

Written By Parag Kokane on Thursday, January 17, 2019 | 7:04 PM

मंडळी, काही दिवसांपूर्वी मालवण मधील, कुडाळ पासून जवळच असलेल्या, परुळे नावाच्या छोट्याश्या खेड्यात, माझ्या सौंच्या मामाकडे जाण्याचा योग आला. परुळ्याची लोकसंख्या जेमतेम ७२० तर घरसंख्या २०० च्या आसपास आहे. कुडाळ पासून २० कि.मी. आणि वेंगुर्ल्या पासून ३० कि.मी. अंतरावर असलेले परुळे, तळ कोकणात आढळणाऱ्या बहुतांशी गावांप्रमाणे डोंगर उतारावर बसलेलं, निसर्गसुंदर गाव आहे.

परुळे गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ६:१५ वाजले होते. घाटातल्या रस्त्यावर एका कडेला गाडी लावली आणि छोट्या पायवाटेने डोंगर उतारावर खाली घराकडे जायला निघालो. गावातील वाड्यांमधून हळूहळू खाली उतरत जात असणाऱ्या त्या रस्त्यावरून चालताना, वाहत्या पाण्याचा मंद आवाज येत होता. पूर्ण खाली पोहोचलो आणि मगाचपासून आवाज येत असलेल्या पाण्याचा प्रवाह दिसला. त्या प्रवाहाला ओलांडून पुढे जाऊन थोडे चढायचे होते. प्रवाह ओलांडण्यासाठी "एकावेळी एक माणूस जाईल" इतक्याच रुंदीचा पूल होता.
Parule Water Stream Bridge
नारळ पोफळीच्या बागा, बारमाही वाहणारा तो प्रवाह, दगड धोंड्यांवरून जाताना होताना होणारा त्या पाण्याचा खळखळाट, सिकाडा किड्यांचा किरकिराट आणि पर्वत कस्तुर (Malbar Whistling Thrush) मारत असलेल्या शिट्ट्या.. "सुख म्हणजे आणखी ते काय", असं माझ्यातल्या पुणेकराला जाणवून गेलं! पूल ओलांडून पुढे थोडं चढायला सुरुवात केली आणि कोकणी धाटणीचं कौलारू घर दिसायला लागलं.
Parule Konkan Home

मोबाईल reception हे जेमतेम एका काडीच्या साक्षीने 'मी अस्तित्वात आहे' हे दाखवण्यापुरतंच; त्यामुळे बाह्यजगताशी नातं आपोआपच तुटलेलं. घरातले सगळे बाहेर उभे राहून आमची येण्याची वाट बघतच होते. "Remote असलेले तुमचं हे गाव किती सुंदर आहे" अस म्हणत मी घरच्या पडवीत चढलो आणि आमचं आगत-स्वागत झालं. मामा-मामी बरोबरच २ गावठी कुत्र्यांची जोडी सुद्धा शेपूट हलवत स्वागताला उभी होती. पडवीतच कडेला गोठा होता आणि त्यात २ म्हशी ठेवलेल्या; माझं चटकन लक्ष गेलं ते गोठ्याला बसवलेल्या लोखंडी जाळीच्या दरवाज्याकडे. "लोखंडी दरवाजा कशासाठी ?".. मी विचारलं. "आडगाव असल्यामुळे आणि पाणी सुद्धा जवळच असल्यामुळे बहुतेक रात्री वाघूट इथे फेऱ्या मारतो".. मामा म्हणाला. "वाघूट म्हणजे कोण .. बिबट्या?".... "तसाच, पण बिबट्या नाही. वाघूट शिकार केल्यानंतर ती स्वतःच्या पाठीवर लादून नेतो, असं बघणारे म्हणतात!". ह्या भागात बिबट्याला वाघूट म्हणतात हे मला नवीनच कळले आणि तिथल्या लोकांचा (गैर) समज ऐकून थोडीशी मजाही वाटली. "आणखीन कोणते प्राणी दिसतात?" ह्यावर, "रानडुक्कर, ससे , साळींदर वगैरे ..", म्हणत मामा आमच्या पिशव्या घेत घरात शिरला. ह्यावरून, सकाळी जितके सुंदर दिसतंय, तितकच रात्री भयाणसुद्धा वाटत असेल ह्याची जाणीव झाली.

माझं मुळात स्वारस्य पक्षीनिरीक्षणात असल्यामुळे कधी एकदा वाहत्या प्रवाहावर जातोय असं झालं होत. पुलावरून येत असतानाच Blue-eared Kingfisher पाहण्याची अशी सुवर्णसंधी सोडायची नाही हे ठरवलंच होत.. Blue-eared Kingfisher हा माझ्या साठी Lifer!

म्हशीच्या ताज्या दूधाचा, फक्कड चहा घेतला, चार गोष्टी बोललो आणि तडक बाजूला असलेल्या प्रवाहाच्या दिशेनं चालू लागलो. बारमाही असलेला हा पाण्याचा प्रवाह वाड्यांमधून खळाळत पुढे कार्ली नदीला जाऊन मिळतो. प्रवाहाच्या वाटेत अनेक वाड्या येतात आणि त्याबरोबर नारळाच्या झावळ्या, पालापाचोळा, मासे, किडे आणि त्यांना खाण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी. कोकणातले संपूर्ण पक्षीविश्वच अशा भागात अवतरते.

पाण्यावर जात असताना वाडीत सर्वप्रथम मोहक आवाज काढण्याऱ्या भृंगराज (Racket-tailed Drongo) ने दर्शन दिले. त्याच्या दिशेने दोन पावलं पुढे टाकली आणि झाडात लपलेल्या पर्वत कस्तुर (Malbar Whistling Thrush) ने माझी चाहूल लागल्याने धूम ठोकली. हे सगळं थबकून बघत असताना, पुढे कडेला रानकस्तूर (Orange-headed Thursh) ची जोडी दिसली.. बघाल तिथे पक्षी, कोणाचा फोटो काढू अशी काहीशी परिस्थिती झाली होती! असं झालं कि नेहमी होत तेच झालं.. कोणाचाच फोटो काढला नाही. 🙂

पाण्यापाशी येऊन पोहोचलो.. त्यातल्या त्यात आडोश्याची जागा शोधली आणि दगडावर आपलं बस्तान मांडून बसून राहिलो. आता, पुढचा काही काळ कोण-कोण भेटीला येतंय याची वाट बघायची होती.
काही वेळातच समोरच्या फांदीवर मलबारचा कवड्या धनेश (Malbar Pied Hornbill) ची जोडी काही सेकंदासाठी येऊन बसली. एव्हाना कॅमेरा सेट झाला होता; त्यामुळे पटकन एक फोटो काढता आला. तळ कोकणात मलबारचा कवड्या धनेश (Malbar Pied Hornbill) ह्यांची संख्या खूप आहे. कोकणात ह्यांना गरुड म्हणून पण संबोधतात. पडवळाच्या वेलींवर हे साप समजून खायला येतात त्यामुळे हे गरुड असावेत असा इथल्या लोकांमध्ये एक समज असल्याचं दिसत.

असाच थोडावेळ गेला आणि किर्रकिर्र आवाज करत वरती Blue-tailed Bee-eater चा गलका उडालेला दिसला. नीट बघितले असताना ते सगळे हवेतल्या हवेत करामती करत माश्यांना पकडत असलेलं दिसलं. ह्याआधी सुद्धा मधमाश्यांच्या पोळ्यावर ताव मारताना मी Blue-tailed Bee-eater ना बघितलेलं होत आणि त्यावेळी बिथरलेल्या माश्या आम्हा फोटो काढणाऱ्यांच्या मागे लागलेल्या सुद्धा आठवलं. त्यामुळे इथून आता निघावं लागतंय का हे बघण्यासाठी एका Blue-tailed Bee-eater चा फोटो काढला. त्याने चोचीत Hummingbird Moth पकडलेला असल्याचा दिसला.
काळजी थोडी कमी झाली आणि मी तिथे तसाच बसून माझे Kingfisher शोधकार्य चालू ठेवले.

सकाळचे ७:१५ वाजले होते, त्या शांत वातावरणात मला लांबून हुमण (Brown Fish Owl) चा आवाज ऐकू येत होता. कदाचित, नुकतीच रात्रपाळी संपवून ते त्याच्या ढोलीत जाऊन बसले असावे. पाण्यावर अधूनमधून निलीमा (Tickell's blue), नीलांग (Verditer), पतंग पक्षी (Asian paradise) हे धावती भेट देत होते. पाण्यावर गवळणी (Water Strider) तरंगताना दिसत होत्या. प्रवाहाच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये किरमिजी सूर्यपक्षी (Vigor's sunbird) आणि जांभळा शिंजीर (Purple sunbird) दिसत होते. क्वचितच, मध्ये घोंगी खंड्या (Stock-billed Kingfisher) चा आवाज येत होता पण दिसत नव्हता.

बराच वेळ वाट बघितल्यावर, घरी परतायच्या आधी थोडं पुढे होऊन किमान घोंगी खंड्या (Stock-billed Kingfisher) दिसतोय का हे बघावं म्हणून कॅमेऱ्यातूनच एक कटाक्ष टाकला आणि सभोवतालचा परिसर बघायला सुरुवात केली आणि... JACKPOT लागलाच!!

काही अंतरावरच एकदगडावर Blue-eared Kingfisher बसलेला दिसला. हा खरंच Blue-eared Kingfisher आहे का छोटा खंड्या (Common Kingfisher) आहे; ह्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे एक एक फोटो काढत, खात्री करण्यासाठी पुढे-पुढे पण सरकत होतो. पण माझी चाहूल लागल्याने तो सुद्धा दूरवर आत जाऊन दडून बसला.
तिथल्याच एका दगडावर पुन्हा एकदा थोडावेळ बसलो आणि पक्की खात्री करून घेतली कि आपण खरंच Blue-eared Kingfisher बघितलेला आहे. यशस्वी झाल्याची भावना मनात घेऊन घरी परतलो.

पुढे कोकणी पाहुणचार अनुभवत दुपारचं जेवण वगैरे आवरून, परुळे गावाचा निरोप घेतला. नवीन ठिकाणी पक्षी बघण्याची, भोवतालचा निसर्ग अनुभवण्याची आणि एकंदरच सर्व वेळ चांगला कारणी लागण्याची मज्जाच वेगळी असते.

परुळ्यातील माझ्या ह्या छोट्या भटकंतीचा आणि पक्षीनिरीक्षणाचा हा छोटासा  व्हिडीओ अवश्य बघा.


परुळे गावापासून अगदी ४ कि.मी. अंतरावर चिपीमध्ये नवीन विमानतळ बांधण्यात आलेला आहे - सिंधुदुर्ग विमानतळ. साधारण ६-७ वर्षांपूर्वी; विमानतळ आहे त्या परिसरात सर्वत्र मासळी वाळत टाकलेली दिसायची. ह्या मेजवानीवर आयता ताव मारायला ब्राह्मणी घार (Brahminy Kite) आणि सागरी गरुड (White-bellied Sea eagle) तिथे हमखास बसलेले दिसायचे. विमानतळामुळे, आता हे दृश्य कदाचित दिसणार नाही ह्याची हळहळ आहे. आशा करतो कि परुळ्यातल्या पक्षीविश्वावर ह्या सगळ्याचा खूप जास्त प्रभाव पडणार नाही.

SHARE

About Parag Kokane

10 comments :

  1. I'm enjoying your experience 😊....... Very nice

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन, सिंधुदुर्गातील कोणत्याही खेडेगावात थोडीफार अशीच स्थिती आहे. ही गावं खरोखर निसर्ग संपन्न आहेत.

    ReplyDelete
  3. फार सुंदर वर्णन, कोकण फारच सुंदर आहे, प्रत्येक ऋतु मध्ये कोकण वेगळं दिसत, कोकणातील निसर्ग वेड लावणारा आहे..कोकणातील देवळ, परंपरा, चालीरीती, फारच वेगळा अनुभव असतो.

    ReplyDelete
  4. Wish to go birding with you bro. grnblr@gmail.com

    ReplyDelete