Magnificent Sikkim

Written By Parag Kokane on Monday, May 13, 2019 | 4:58 PM

शाळा संपून अनेक वर्ष झाली असली तरी एक गोष्ट सुटली नाही ती म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीचं आणि सुट्टी दरम्यान सहलीला जाण्याचं आकर्षण! वास्तविक सहलीला जाण्याच्या खूप अगोदर पासूनच सहलीच्या नियोजनाच्या चर्चा चालू होतात. जाण्याचे ठिकाणं ठरवणे, कोण येतंय कोण नाही ह्याची यादी करणे, दिवस वेळ आणि ठिकाण ठरल्यावर ऑफिस मध्ये रजा टाकणे, सहली साठी लागणारे सामान आणि खरेदी, खर्चाचा अंदाज काढणे ह्या सगळ्यातच एक वेगळी मज्जा असते.

सालाबादाप्रमाणे, २०१९ च्या जानेवारी महिन्यात "ह्यावर्षी मे महिन्यात फिरायला कुठे जायचं!!" अशी आमची मित्रांची चर्चा चालू झाली. बुधवार, १ मे ची सुट्टी मधल्याच दिवशी येत असल्याने, "मागे पुढे २ रजा टाकूयात आणि शनिवार रविवार धरून चांगले ९-१० दिवस फिरायला जाऊयात" ह्यावर सर्वांची संमती झाली. सुरुवातीला, "मुलांचे परीक्षांचे निकाल ३० एप्रिल ला मिळणार आहेत" असा यक्ष प्रश्नही निर्माण झाला होता पण कालांतराने "ते नंतरही मिळवता येतील किंवा घेईल कोणीतरी" असा मार्ग काढून तो सुटला.

परदेशगमन करावे का ह्यावर सर्वांचाच स्वदेशीचा आग्रह होता आणि उन्हाळयात फिरायला जाणार असल्याने थंड हवेच्या ठिकाणी जाणे हे सुद्धा अपेक्षितचं होते. त्यावरून आमहाला "सिक्कीम ला जायचं" हे ठरवायला किती वेळ लागला हे तुम्हाला कळलंच असेल. आम्ही घरटी ३ माणसं असलेली ३ कुटुंब म्हणजे ९ जण सहलीला जाण्यास तयार झालो. थंडीच्या ठिकाणी जायचं म्हणजे साहजिकच स्वेटर, कानटोप्या, थर्मल्स, लोकरी मोजे अशा अनेक कपड्यांच्या खरेदीची मध्ये भर पडलीच होती. शिवाय, वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी लागू नये म्हणून किंवा ऑक्सिजन कमी पडल्यास वापरण्यासाठी लागणारी औषधेसुद्धा बरोबर आलीच.

सिक्कीम मध्ये सुद्धा - "पूर्व सिक्कीम मध्ये सिल्क रूट" ची सहल करावी हे सर्वांचं नक्की ठरलं.

सिल्क रूट हा मार्ग जुन्या काळात भारत आणि चीन दरम्यान व्यापाराच्या उद्देशाने वापरला जात असे. रेशीम हि त्यातली सर्वात जास्त व्यापार केली जाणारी वस्तू.. आणि म्हणूनच हे नाव. सिल्क रूट हा मार्ग भूतान, सिक्किम, पश्चिम बंगाल, चीन आणि इतर अनेक प्रदेशांना एकत्र जोडतो. नोव्हेंबर आणि एप्रिल दरम्यान, हा मार्ग पूर्णपणे हिमवर्षावाने व्यापलेला असतो. त्यादरम्यान इथे प्रवास करणे अवघड काम आहे. पण, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या सुरवातीच्या काही दिवसात, हाच मार्ग अक्षरशः प्रेक्षणीय बनलेला असतो आणि ह्याच मार्गात आहेत भारतातली सुंदर अशी काही पर्यटन स्थळे!

प्रवास थोडासा कठीण असेल असे वाटल्याने आम्ही काही निवडक ठिकाणीच भेटी द्यायचा आणि तिथे शक्यतो होम स्टे (घरगुती निवास) करण्याचा विचार केला. आम्ही ठरवलेली पर्यटन स्थळे खालील प्रमाणे -
 • गँगटोक (सिक्कीम) - २ दिवस
 • नथांग व्हॅली (सिक्कीम) - १ दिवस
 • झुलूक (सिक्कीम) - १ दिवस
 • सिलरी गाव (प. बंगाल) - १ दिवस
 • दार्जिलिंग (प. बंगाल) - २ दिवस
पुण्यापासून गँगटोक ला जाण्यासाठी, पुणे - कलकत्ता विमानाने जाणे हा आमचा पहिला टप्पा होता.

दुसऱ्या टप्प्यात पुढे कलकत्याहून गँगटोक ला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत:
 • कलकत्ता ते न्यू जलपायगुडी (ट्रेन)
 • कलकत्ता ते बागडोंगरा (विमान)

आणि तिसऱ्या टप्यात, न्यू जलपायगुडी/बागडोंगरा इथून पुढे गाडीने गँगटोक ला जाणे असा शेवटचा प्रवास होता.

विमानाची तिकिटे मिळत नसल्याने; आम्हाला ट्रेन ने जाण्याचा पर्यायच निवडावा लागला. आणि ट्रेन रात्रीची असल्यामुळे आमच्या प्रवासात कलकत्ता मध्ये जाता-येताना आणखीन २ दिवस थांबण्याची आम्हाला तयारी करावी लागली. आमचा, नवीन ठरलेला सहलीचा आराखडा खालील प्रमाणे -
 • दिवस १: पुणे ते कलकत्ता
 • दिवस १/२: कलकत्ता ते न्यू जलपायगुडी
 • दिवस २: न्यू जलपायगुडी ते गंगटोक
 • दिवस ३: गंगटोक पर्यटन
 • दिवस ४: गंगटोक ते नथान्ग व्हॅली
 • दिवस ५: नथान्ग व्हॅली ते झुलूक
 • दिवस ६: झुलूक ते सिलरी गाव
 • दिवस ७: सिलरी गाव ते दार्जिलिंग
 • दिवस ८: दार्जिलिंग पर्यटन
 • दिवस ९: दार्जिलिंग ते न्यू जलपायगुडी
 • दिवस ९/१०: न्यू जलपायगुडी ते कलकत्ता
 • दिवस १०: कलकत्ता ते पुणे
कलकत्ता:
आम्ही ठरलेल्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल ला उगवत्या सूर्याच्या साक्षीने कलकत्याला निघालो. साधारण स.१०:०० वाजता आम्ही कलकत्ता इथे पोहोचलो. कलकत्त्यात तापमान साधारण ३०°C इतके होते. कलकत्त्यामध्ये विमानतळापासून जवळच भाड्यावर आम्ही एक हॉटेल रूम घेऊन ठेवली होती. तिथे आमच्या जवळचे सामान ठेवले, दिवसभरासाठी २ cabs केल्या आणि संध्याकाळ पर्यंत कलकत्त्यात फिरलो.
रात्री ९:३० वाजता आम्ही कलकत्ता स्टेशन वरून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मला रेल्वेने प्रवास करून साधारण २०-२२ वर्ष तरी उलटून गेली असतील. आणि तो प्रवास पण कोणता तर पुणे ते मुंबई. त्यामुळे १०-१२ तासाच्या रेल्वेच्या प्रवासाबद्दल पहिल्यापासूनच साशंक होतो. स्वच्छता असेल कि नाही, आजूबाजूची लोक कशी असतील, आपआपल्या बॅगा पकडून झोपायचं कस वगैरे असे अनेक प्रश्न होते. मनात असलेलं असलेलं समीकरण जुळलं होत. जसा विचार केला होता वास्तवात अगदी तसच घडत होत. पुढचा प्रवास चांगला असेल ह्याचा विचार करत रेल्वेमध्ये मला दिलेल्या जागेवर निमूटपणे झोपलो.
न्यू जलपायगुडी स्टेशनवर सकाळी ८:३० वाजता पोहोचलो. आणि २ इनोव्हा गाड्यांनी आम्ही ९ जण गँगटोक कडे लगेच रवाना झालो. रस्त्यात जाताना तिस्ता नदी शेजारचा वळणावळणाचा रस्ता पार करत होतो पण उकाडा मात्र अजूनही जशाच्या तसा होता.

गँगटोक (२ दिवस):
साधारण दुपारी २:३० दरम्यान आम्ही गँगटोकला पोहचलो. गँगटोक खूप सुरेख टुमदार शहर भासत होते. आम्ही पोहोचलो तेव्हा तापमान १८°C होते. बाहेर सगळीकडेच सुशोभीकरणाकडे विशेष भर दिला आहे हे स्पष्ट दिसत होते. बघाल तिथे फुलझाडं! घरातल्या खिडक्यांमध्ये, कट्ट्यांवर, रस्त्यांमध्ये सगळीकडेच. संध्याकाळी आम्ही गँगटोक च्या प्रसिद्ध एम.जी.मार्गावर गेलो. एम.जी.मार्ग हा फक्त पादचाऱ्यांसाठी खुला आहे. तिथे सुद्धा सगळीकडे फुलांचं डेकोरेशन, रोषणाई, स्वच्छता, दोन्हीबाजूने खाण्याची दुकानं, गिफ्ट शॉपी, बसायला बाकडी ठेवलेली. रात्री hangout करण्यासाठी मस्त जागा.
दुसऱ्या दिवशी आम्ही बन झाकरी वॉटरफॉल ह्या ठिकाणी गेलो. आम्ही राहत होतो तीहून अगदी ४ कि.मी. अंतरावर असलेला हा धबधबा अत्यंत सुंदर होता. चोहोबाजूनी हिरवे डोंगर, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अनके छोट्या "लाकडी पूल" बांधून केलेल्या वाटा खूप मोहक होत्या. तिथे सुद्धा प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे स्वच्छता! खाण्यासाठी हॉटेल्स, गिफ्ट शॉप, मुलांना बोटिंग साठी केलेली जागा सर्वच सुंदर. निसर्ग संपन्न अशा ह्या ठिकाणी पक्षी निरीक्षणाच्या सुद्धा अनेक संधी उपलब्ध होऊन गेल्या.
नथान्ग (१ दिवस):
तिसऱ्या दिवशी गँगटोकचा निरोप घेत आम्ही सकाळी ९:०० वाजता नथान्ग ला जायला निघालो. वाटेत आम्ही चांगू लेक ला थांबणार होतो. गँगटोक ते चांगू हा प्रवास साधारण २.५ तासाचा आहे. आमची सुरुवात काही चांगली झाली नाही. जेमतेम ३० मिनिटांचा प्रवास झाला असेल आणि घाटात आमच्या गाड्या भल्या मोठ्या रांगेत अडकल्या. बातमी मिळाली कि वरती घाटात आर्मी चा ट्रक उलटलाय आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान ४ तास तरी लागतील. आम्हाला त्या घाटात वाट बघत थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
बऱ्याच गाड्या उभ्या राहिल्याने सहप्रवासी पण खूप होते. वेळ घालवण्यासाठी काही जण रस्त्या शेजारील असलेल्या दरीत उतरले. पण अनेकांना जळवा लागल्याने ते परत आले. वेळ जसा पुढे जात होता तशा काही गाड्या उलट्या दिशेला फिरून गँगटोक ला परत निघाल्या. एव्हाना बोचरा वारा आणि पाऊस सुद्धा सुरु झाला होता. गाडीतून बाहेर येणे कठीण झाले होते पण आम्हाला परत तिथेच थांबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अखेर, ४ तासाच्या विलंबानंतर दुपारी २:३० वाजता आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.

आम्ही जस जसे घाटमाथ्यावर चढत होतो, थंडीचा कडाका वाढतच होता आणि भरीला पाऊस सुद्धा. आता रस्त्यात तुरळक बर्फ दिसायला सुरुवात होऊ लागली होती.

चांगु लेक
चांगु लेक हे सोभोवतालच्या हिमपर्वतांमध्ये असलेला एक सुरेख तलाव आहे. अत्यंत प्रेक्षणीय असलेल्या ह्या तलावा मध्ये डोंगर आणि पर्वतांच प्रतिबिंब सुरेख दिसत. इथल्या रोपवे ने तुम्ही वरील फोटोत उजवीकडे डोंगर दिसतोय तिथे वर जाऊ शकता.
चांगु लेक इथे आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे ४:०० वाजले होते. खरं तर; ४:०० वाजता चांगु लेक येथील सर्वच पर्यटन बंद होते. म्हणजे, रोपवे, हॉटेल्स, रस्त्यावरच्या खाण्याच्या गाड्या वगैरे. पण त्यादिवशी मात्र वाहतूक ठप्प असल्या कारणाने त्यांना ५:०० पर्यंत व्यवसाय करण्याची आर्मी ने मुभा दिली होती. चांगु लेक इथे आम्ही पोहोचलो तेव्हा तापमान ६°C इतके होते.
आम्ही थंडीत कुडकुडत आणि पावसात भिजत पटकन रोपवे मध्ये गेलो. रोपवे मधून जातं चांगु लेक आणि आजूबाजूचा परिसर छान दिसत होता.
आम्ही वरती पोहोचलो आणि हवामानात खूप वेगाने बदल झाला. गारांचा तुफान पाऊस पडायला लागला. आणि खाली येण्याची रोपवे काही मिनिटांसाठी बंद ठेवली. ती परत सुरु होऊन आम्ही खाली आलो तो पर्यंत खाली उभ्या असलेल्या सर्व गाड्या निघून गेल्या होत्या, खाण्या पिण्याची दुकाने बंद झाली होती इतकाच काय तर रस्त्यावर कडेला उभे असलेले याक सुद्धा आपापल्या घरी बिघून गेले होते. तेव्हा संध्याकाळचे ५:०० वाजले होते आणि काळोख पडायला सुरुवात झाली होती आणि त्या परिसरात फक्त आमच्या २ गाड्या होत्या.
आम्ही तसेच परत एकदा पावसात भिजत गाड्यांमध्ये जाऊन बसलो आणि नथान्ग ला जायला निघालो. आम्हाला अजून ३० कि.मी. प्रवास करायचा होता ज्याला साधारण २ तास वेळ लागणार होता.
आम्हला रस्त्यात पहिल्या नाक्यावरच आर्मी च्या सुरक्षा रक्षकांनी थांबवलं आणि खराब हवामानात तुम्हाला पुढे जात येणार नाही असं सांगितलं. आम्ही झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला, आणि त्यांनीही नंतर उच्च अधिकाऱ्यांची परवानगी घेत आम्हाला सरते शेवटी पुढे जाण्यास होकार दिला. आधी छान दिसत असणारे हिमपर्वत अंधार होत होता तसे आणखीनच भयाण भासू लागले होते.
वाटेत वेळोवेळी आर्मी सुरक्षा रक्षक आम्हाला अडवत होते आणि आम्ही थोड्या चर्चेनंतर पुढे जात होतो. खरतर हा खूपच खडतर प्रवास होता. एक वेळ अशी आली होती कि आधीच काळोख आणि त्यात ढग आल्याने २-३ फुटांपेक्षा जास्त पुढचे काहीच दिसत नाहीये. गाडीच्या पुढच्या दिव्यांमध्ये पुढे जणू काय एक पांढरी भिंतच ठेवली आहे असं काहीतरी भासत होतं. त्यात बाजूला खोल दऱ्या आणि वरून पाऊस. आम्ही नथान्ग व्हॅली इथे रात्री ८:०० वाजता पोहोचलो. जोरदार पाऊस तर होताच पण तेव्हाचे तिथले तापमान -२°C इतके होते.
तुम्ही कोणी जर अशा ठिकाणी प्रवासाला जाणार असाल, तर प्रवास करताना ४:३० पर्यंत आपल्या सुनिश्चित स्थळावर पोहोचण्याचा प्रयत्न करा.

नथान्ग व्हॅली
नथान्ग व्हॅली ची समुद्र सपाटीपासूनची उंची १३५०० फूट. नथान्ग व्हॅली मध्ये पोहोचलो तेव्हा थंडीने सर्वच गारठून गेलो होतो. आम्ही एका घरगुती निवासात थांबलो होतो. बाहेर -२°C असेल तर ते घराच्या आतमध्ये -३°C जाणवत होत. घराच्या आत रूम हिटर नाहीत हे बघून खर तर घाम फुटायला हवा होता पण तोही फुटेना. विचारणा केल्यावर रु.८०० प्रमाणे घरमालकिणीने आम्हाला एक छोटा हिटर दिला. ऑक्सिजन कमी पडत असल्याने डोकं सुद्धा दुखायला लागलं होत. ह्यावर इलाज म्हणून भीमसेनी कापराच्या वड्या हुंगत बसलो होतो. त्या रात्री अगदी वीज कडाडून पाऊस पडला आम्ही कसेबसे झोपलो.
दुसरा दिवस उजाडला सकाळी ४:३० वाजता. पाऊस ओसरलेला, हवेत गारवा होता पण सुसह्य होता. छान ऊन पडलं होत आणि आम्ही राहत होतो तिथे चारही बाजूनी असलेले डोंगर दिसू लागले होते.

सकाळचा चहा नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही २ तासाचा प्रवास करून झुलूक इथे जाणार होतो. नथान्गहून निघाल्यावर रस्त्यावर अनेक ठिकाणी बर्फ पडलेला दिसत होता. आणि मुलांच सिक्कीम मध्ये येण्यामागे महत्त्वाचं आकर्षण होत बर्फात खेळायचं. त्यामुळे रस्त्यात काहीवेळ थांबून मुलांनी त्याचा आनंद लुटला.
झुलूक ला जात असताना Zig zag road वर पर्यटक अवश्य थांबतात. इथले दृश्य अफलातून आहे. ढग नसताना नागमोडी रस्ता संपूर्ण दिसतो आणि खाली घाटामधून झुलूक गाव डोकावताना दिसते.

झुलूक (१ दिवस):
झुलूक हे गाव समुद्र सपाटीपासून ९००० फूट उंचीवर आहे. त्यामुळे साहजिकच इथली थंडी आता थोडीशी कमी झाली होती. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथले तापमान होते ८°C. घाटातल्या रस्त्यांवर बसलेल्या ह्या गावाची लोकसंख्या सुद्धा साधारण ३०० एवढीच होती. एका बाजूला खोल दऱ्या तर दुसरीकडे उंच पर्वतांच्या भिंती. झुलूक गावामध्ये आमच्या कार्यक्रमात करण्यासारखे तसे काहीच नव्हते फक्त निसर्ग उपभोगायचा होता. डोंगर उतारांवर झाडाझुडपांमधून अनेक वेगवेगळे पक्षी दिसत होते.

सकाळी चहा आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही झुलूक सोडलं. झुलूक हे आमचं सिक्कीम मधाळ शेवटच गाव. आता आम्ही सीमोल्लंघन करून प.बंगाल मधल्या सिलरी गावात निघालो.
सिलरी (१ दिवस):
सिलरी मध्ये येतानाचा रस्ता हा खूप खच खळग्यांचा होता. पण संपूर्ण पणे झाडा-झुडपांमधला. पाऊस सुद्धा जोरात पडत होता. सिलरी गावाची लोकसंख्या जेमतेम ३० घरांची होती. एखाद्या सदाहरित वर्षावनात राहण्याचा तिथला आमचा अनुभव होता. पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला सिलरी गाव हे सर्वाधिक आवडलं. लोकवस्ती कमी, समोर कांचनगंगा, आणि ऊन पावसाचा खेळ अशा वातावरणात वेळ अत्यंत मस्त जात होता.
सिलरी मध्ये जवळच sunset point आहे. साधारण २-३ कि.मी. चा चिखल तुडवत पायी जायचा झाडांमधला रस्ता आहे. आम्ही सर्वानी संध्याकाळी तिथे जायचं ठरवलं. रस्त्यात जाताना पक्षी, साप, सरडे, बेडूक वगैरे बघत जाताना खूप मज्जा येत होती. पण त्याचबरोबर तिथे जळवा पण खूप होत्या; चालत असताना बुटांवरती चढलेल्या जळवा सारख्या काढून टाकाव्या लागत होत्या.. ते कमी म्हणून रस्त्यावरून तसेच पुढे जात असताना जोरदार पाऊस आला आणि शेवटी आम्हाला परत फिरावे लागले. सनसेट पॉईंट पर्यंत जाऊ नाही शकलो त्याचा खेद आहे पण त्या रस्त्याच्या मात्र प्रेमात पडलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एकटाच परत त्या रस्त्यावर जाऊन उरले सुरले पक्षीनिरीक्षण करून आलो.
आमची आता दार्जिलिंग ला निघायची वेळ झाली होती. पण कोणाचेच पाय सिलरी मधून निघत नव्हते.

दार्जिलिंग (२ दिवस):
आमच्या पूर्ण प्रवासा दरम्यान आम्हाला सर्वात कमी आवडलेलं गाव म्हणजे दार्जिंलिंग. खूप गर्दी, गिचमिड, कचरा वगैरे बघून आम्हाला प्रश्न पडला कि इथे आपण २ दिवस काय करणार आहोत? एक दार्जिंलिंग चा प्राणिसंग्रहालय सोडल्यास - त्यात सुद्धा रेड पांडा, स्नो लेपर्ड, क्लाऊडेड लेपर्ड इ. सोडल्यास; आम्हाला दार्जिलिंग मध्ये काहीच आवडलं नाही. स्वर्गीय सिक्कीम बघून आल्यानंतर दार्जिलिंग मध्ये येणे हा काही चांगला पर्याय नाही हे कळून चुकलं.
दोन दिवस आम्ही दार्जिलिंग च्या मार्केट मध्ये, बटासिया लूप ला जाणे, चहाचा मला बघणे वगैरे काही ठिकाणी फिरलो आणि आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणेज न्यू जलपायगुडीला जायला निघालो.
न्यू जलपायगुडीला संध्याकाळची ७:०० ची ट्रेन पकडून आम्ही कलकत्ता इथे निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० ला टर्न हावडा स्टेशन ला पोहोचायची होती. ट्रेन सुरु झाली आणि एक बातमी कळली ती म्हणजे फॉनी वादळ आज रात्री कलकत्ता मध्ये १:३० ला येणार आहे. इतके दिवस जगाशी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने आम्हाला ह्याची काहीच कल्पना नव्हती. ट्रेन मध्ये जरा साशंक मनानेच बसलो कि वेळेत पोहोचतो कि नाही. आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री ९:०० च विमान पकडून पुण्यात यायचं होत त्यामुळे सकाळी ६:०० ची ट्रेन थोडी फार उशिरा पोहोचली असती तरी तेवढा आधार होताच.
निर्विघ्न पणे कोणत्याही अडचणी ने येत आम्ही ठरल्या वेळेत म्हणजे ६:०० वाजता कलकत्ता इथे पोहोचलो. दिवसभर परत एकदा कलकत्ता इथे फिरुन आम्ही रात्री पुण्यात परत आलो.

थोडक्यात माहिती
तुमच्यापैकी कोणी जर ह्याच स्थळांना धरून सहल ठरवत असाल तर आमच्या अनुभवावरून तुम्हाला २ पर्याय सुचवावेसे वाटतात -
 • गँगटोक, नथान्ग, झुलूक, (अरितर), सिलरी, दार्जिलिंग - असाच क्रम तुम्ही ठरवत असाल तर दार्जिलिंग ला तुम्ही सरळ वजा केलेत तरी चालेल.
 • किंवा - तुम्ही सुरुवात दार्जिलिंग पासून करावी आणि हाच क्रम उलट बघावा म्हणजे - दार्जिलिंग, सिलरी, (अरितर), झुलूक, नथान्ग, गँगटोक.
वरील दिला आहे तो आमचा अनुभव!! तुमचा ह्यापेक्षा कदाचित खूप वेगळा सुद्धा असू शकतो. कमेंट मध्ये तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला अवश्य कळवू शकता.

Magnificent Sikkim
आमच्या प्रवास दरम्यान, सिक्कीम मधील निसर्गाची थोडी ओळख करून देण्यासाठी एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे तो अवश्य बघा:

SHARE

About Parag Kokane

With my camera and binoculars, I wander through the beautiful landscapes of the Western Ghats, capturing the amazing wildlife and nature around us. On this blog, you'll find exciting wildlife observations, my thoughts on protecting nature, and more. Join me as we explore and help protect the beauty of our world together.

0 comments :

Post a Comment